बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०

पुढची पायरी चे प्रास्ताविक

 नमस्कार माझ्या तरुण मित्रांनो!


२०१७ साली लोकसत्ता दैनिकाने मला वर्षभर एक लेखमाला लिहिण्यासाठी  निमंत्रित केले. २०१७ च्या जानेवारी महिन्यापासून  डिसेम्बर महिन्यापर्यंत दर पंधरा दिवसांनी शनिवारी हा स्तंभ दैनिक लोकसत्तेच्या अंकात प्रसिद्ध होणार होता आणि नाव होतं “पुढची पायरी”


जवळ जवळ पंधरा वर्षाच्या अभ्यासानंतर आपण पण पदवी किंवा पदविका प्राप्त करतो. आपला उद्देश असतो आपल्याला एक चांगली नोकरी मिळावी  व उदरनिर्वाहाची सोय व्हावी. तशी एखादी नोकरी  मिळते सुद्धा! पण अगोदरच्या आपल्या  विद्यार्थी दशेतील अनुभव नोकरीमध्ये उपयोगी पडत नाही. त्याचे कारण असतं आपण आत्तापर्यंत शिकत असतो, नवीन नवीन ज्ञान घेत असतो पण हे ज्ञान कसे वापरावे व पैसे कसे कमवावेत यांच्या बद्दल आपल्याला शाळेत आणि महाविद्यालयात काहीही शिकवत नाहीत. 


नोकरीच्या जाहिरातीला अनुसरून आपण अर्ज करतो आणि बोलावले तर मुलाखतीला  जातो.   आपली मुलाखत चांगली झाली असेल, मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपली छाप पडली असेल तर आपल्याला नोकरीही मिळते आणि आपण नोकरीवर दाखलही होतो. परंतु अगदी पहिल्या दिवसापासून ह्या  नोकरीत कसे वागावे कसे टिकून राहावे आणि आपली प्रगती कशी करावी याचा एक संभ्रम मनात भरून राहतो.


पुढची पायरी या लेखमालेत मुख्यत्वेकरून याच  संभ्रमाचे निराकारण करायचा प्रयत्न केला आहे. आपण ह्या लेखातील विचारांचा अवलंब केलात व त्याप्रमाणे आपल्या नवीन नोकरीत वागलात  तर आपल्या कारकिर्दीतील ही पहिली पायरी आपण यशस्वीपणे  ओलांडू शकाल याची मला खात्री आहे.


२०१७ मध्ये २४ भागांची ही लेखमालिका जेव्हा प्रसिद्ध झाली होती तेव्हा दर पंधरवड्याला मला खूप मोठ्या प्रमाणावर वाचकांचा प्रतिसाद यायचा.  पहिल्यांदा मला वाटले आपल्यासारखेच अनेक तरुण मित्रच ही लेखमाला वाचत असतील आणि प्रतिसाद देत असतील; पण एक गमतीची गोष्ट अशी मला प्रतिसाद देणा-यामध्ये अनेक अनुभवी व्यक्ती पण होत्या. त्या मध्ये पुण्यातील एक अस्थिरोग तज्ज्ञ, नागपुर मधील एक डॉक्टर, डोंबिवलीतील शिक्षिका तर पुण्यातीलच  एका मल्टिनॅशनल कंपनीतून निवृत्त झालेले उपाध्यक्ष म्हणजे  व्हॉइस प्रेसिडेंट (माझ्यापेक्षा वयाने बरेच मोठे असलेले),  यांचाही समावेश होता.


यावरून एक सिद्ध झाले की पुढच्या पायरी मध्ये हे लिहिलेल्या विषयांची गरज फक्त माझ्या तरुण मित्रांना नव्हती तर समाजातील अनेकांना होती आणि त्यामुळेच ह्या ब्लॉगच्या आधारे मी लोकसत्ता दैनिकात  २०१७ साली  प्रसिद्ध झालेले हे  लोकप्रिय लेख परत प्रसिद्ध करीत आहे. हे  ब्लॉगच्या स्वरुपात प्रसिद्ध होत असल्याने याला फार मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळेल असे वाटते.


माझ्या लेखमालेला पुढची पायरी हे अतिशय चपखल नाव देऊन दर पंधरा दिवसांनी त्याच्याबरोबर उत्तम चित्र जोडून ही लेखमाला लोकसत्ता दैनिकाने प्रसिद्ध केली याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे. 


आपल्यालाही लेखमाला आवडल्यास आपण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना तसेच आपण शिक्षक असल्यास आपल्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या नोकरीतल्या कनिष्ठांना अवश्य पुढे पाठवा; जेणेकरून त्यांना त्यांच्या आयुष्यात ह्या लेखमालेतील विचारांचा अवलंब करून प्रगती साधता येईल.


तसेच  आपल्याला काही शंका विचाराच्या असतील किंवा प्रतिसाद द्यायचा असेल तर आपण माझ्या jayantpanse.blog@gmail.com वर कधीही पाठवू शकता. मी शक्यतो लवकरात लवकर आपल्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करेन.



धन्यवाद 


© डॉ. जयंत पानसे 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पुढची पायरी - अनुक्रम

  पुढची पायरी ही लेखमाला  लिहिताना अमुक एक  असा आराखडा  काही मनात नव्हता.  उद्योग क्षेत्रात अगदी खालच्या स्तरापासून  ते उद्योग प्रमुख  म्हणज...