११. कार्यालयीन राजकारण

कार्यालयीन राजकारणाचा मुख्य उद्देश असतो फायदा मिळवायचा - वैयक्तिक अथवा गटाचा.

 ग्राफिक्सचे क्रेडीट: लोकसत्ता टीम 

माणसांमध्ये राहायचे म्हटले की गट आणि गटबाजीदेखील अपरिहार्यच. ऑफिसमध्येही तसेच होते. नोकरीच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही ठरवता की कुठल्याही गटात सामील व्हायचे नाही. पण तुम्ही कळत नकळत कुठल्या ना कुठल्या गटात ओढलेच जाता.

 

कार्यालयीन राजकारणाचा मुख्य उद्देश असतो फायदा मिळवायचा वैयक्तिक अथवा गटाचा. मग त्यासाठी धोरणे आखली जातात. चाली खेळल्या जातात. पण एकंदरीतच वैयक्तिक आणि सर्वागीण कार्यालयीन कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होतो. सध्याच्या अतीव स्पर्धायुगात गुड ऑफिस पॉलिटिक्सप्रत्येकाने समजून  घेऊन अंगीकारले तर तुमची, गटाची प्रगती व फायदा होणार आहे. तेसुद्धा शक्यतो कुणालाही न दुखवता व सहकाऱ्यांच्या नातेसंबंधात कडवटपणा निर्माण होऊ  न देता. याची दोन मूलतत्त्वे म्हणजे परस्परपूरक व्यावसायिक व वैयक्तिक नातेसंबंधांची वीण तयार करणे आणि अशा नात्यांचे काळजीपूर्वक संवर्धन करणे.

 

पुढे दिलेल्या गोष्टींची नीट निरीक्षणे केल्यावर तुम्हाला कार्यालयातील घडामोडींमागे कोण आहे ते कळेल:

 

v आपल्या कार्यालयामधील खरे प्रभावी सहकारी कोण आहेत?

v काही सहकारी असे आहेत की त्यांच्याकडे अधिकार आहेत पण ते अधिकारांचा वापर करण्याला घाबरतात किंवा तो करतच नाहीत.

v आदरणीय सहकारी कोण आहेत?

v कुणाचा कुणावर वरदहस्त आहे?

v कार्यालयातील गुरूकोण? म्हणजे अशी व्यक्ती ज्यांच्याकडे गेल्यावर हमखास आपले प्रश्न सुटतील आणि ज्ञानात भर पडेल.

कार्यालयातील राजकारण समजण्यासाठी आधी कार्यालयातील अनौपचारिक सामाजिक संबंधांची पण जाण आली पाहिजे. त्यासाठी पुढे दिलेल्या गोष्टींची पण नोंद घ्या:


v कुणा-कुणाचे चांगले पटते?

v कुठले-कुठले गट आहेत? आणि त्या गटातील सहकारी एकत्र का येतात?

v कुणाचे आणि कशामुळे गट निर्माण झाले आहेत?

v कोणत्या एका व्यक्तीसोबत सर्वात जास्त लोकांची भांडणे किंवा मतभेद आहेत?

v कार्यालयामधील नातेसंबंधाचा पाया मैत्री आहे का आदर? का इतर काही?

v कुणाचे एकमेकांशी वैयक्तिक मतभेद आहेत व त्याची करणे काय?


वरील प्रकारच्या मूलभूत संशोधनानंतर तुम्ही आता तुमच्या फायद्यासाठी कार्यालयीन राजकारणात भाग घेण्यासाठी सज्ज झाला आहात. राजकारणाच्या या तलावात उत्तम रीतीने पोहता येण्यासाठी तुम्ही आता पुढील गोष्टी हळूहळू करा.

 

v कार्यालयामध्ये स्वत:चे नातेसंबंध निर्माण करा. एखाद्या सहका-याच्या नातेसंबंधाचे अनुकरण करू नका. तसे केल्यास तुम्ही आपोआपच त्याच्या गटाचा भाग व्हाल.

v जे कर्मचारी राजकारण करतात, त्यांना घाबरू नका. उलट त्यांच्याशी पुरेशा अंतरावरील सकारात्मक संबंध दृढ करा.

v तुमच्या समकक्ष सहका-या सोबतच वरिष्ठांशी आणि कनिष्ठांशीही उत्तम संबंध राखा.

v ज्यांच्याकडे अनौपचारिक सत्ता असू शकेल, अशांबरोबर मैत्री वाढवा.

वरील सर्व नातेसंबंध जोडताना, तुम्हाला त्यांच्याविषयी केवळ आदर आणि विश्वास आहे, याची जाणीव सर्वाना करून द्या. सगळ्यांशी मैत्री करा पण एका अंतरावरून. कुणाच्या गटात सामील होऊ नका. योग्य अंतरावरील मैत्रीमुळे तुम्ही कोणत्याही गटाच्या सदस्याची कधीही मदत घेऊ शकता.

वर दिलेल्या गोष्टी एका दिवसात होत नाहीत तर काही महिने, कदाचित काही वर्षे त्यासाठी द्यावी लागतात. स्वत:च्या सकारात्मक फायद्यासाठी केलेली ही एक दीर्घ मुदतीची गुंतवणूक आहे, असे समजा. या राजकारणाचा उपयोग करून घेण्यास आणि त्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा.

 

v कार्यालयीन राजकारणामध्ये उत्तम श्रोता होण्याची गरज असते. वक्ता नव्हे. तेव्हा निरर्थक बडबड टाळा आणि सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐका.

 

v तुमच्या कामात तुम्ही प्रावीण्य प्राप्त करा. आळशी व कामचुकार सहकारी कुणालाही आवडत नाही. तुमच्या छोटय़ा यशाची जाहिरात करू नका, पण त्याच वेळेला कार्यालयातील तुम्ही विकसित केलेल्या नातेसंबंधातील सहका-यांना हे यश कळेल अशीही काळजी घ्या.

 

v नवीन कामाच्या संधी, नवीन आव्हाने कायम शोधत रहा आणि त्यात यशस्वी व्हा. त्याकरिता कार्यालयातील तुम्ही विकसित केलेल्या नातेसंबंधाच्या सहका-यांची बिनधास्त मदत घ्या व यशस्वी झाल्यावर त्यांचे जाहीर आभार माना.

 

v या प्रवासात कार्यालयातील काही नाठाळ सहका-यांशी तुमची गाठ पडेल. स्वत:च्या फायद्यासाठी लोकांना वापरून घेणे, भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब करणे, इतर सहका-यांशी अनादराचे वागणे, वरिष्ठांचे लांगुलचालन या गोष्टी त्यांची खासियत असतात. अशा व्यक्तींबरोबर काम करण्याची किंवा त्यांच्याकडून काम करवून घेण्याची वेळ आली तर जेवढय़ास तेवढे वागणे बरे.

 

नाठाळ सहकारी वाजवीपेक्षा जास्त फायदा करून घेण्यासाठी तुमच्या बुद्धीचा उपयोग करतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना सावध राहा. त्यांचे हेतू समजून घ्या नाहीतर तुमचा बळीचा बकरा व्हायचा.

 

अर्थात कायम एक गोष्ट ध्यानात घ्या, ती म्हणजे स्वतचा फायदा जरूर पाहा, पण दुस-यांच्या फायद्याची किंमत देऊ नका. कुणाचे वाईट करून किंवा उगाचच कुरघोडीचे राजकारण करून अल्प मुदतीतील फायदा मिळेल, पण समाधान शून्य. उलट राजकारणाचा सकारात्मक उपयोग केल्यास दीर्घ मुदतीचा फायदा, सर्वाशी चांगले संबंध राहतील आणि समाधान मिळेल.

 

तेव्हा शुभेच्छा!

आपल्याला काही शंका विचारायच्या असतील किंवा प्रतिसाद द्यायचा असेल तर आपण - jayantpanse.blog@gmail.com ह्या माझ्या मेल आयडी वर कधीही पाठवू शकता. मी शक्यतो लवकरात लवकर आपल्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करेन.

© डॉ. जयंत पानसे 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पुढची पायरी - अनुक्रम

  पुढची पायरी ही लेखमाला  लिहिताना अमुक एक  असा आराखडा  काही मनात नव्हता.  उद्योग क्षेत्रात अगदी खालच्या स्तरापासून  ते उद्योग प्रमुख  म्हणज...