२२. कार्य आणि आयुष्याचा समतोल

 

हळूहळू या आत्मसंतुष्टतेची सवय लागते व त्याचे व्यसन कधी होते हे लक्षातच येत नाही.

ग्राफिक्सचे क्रेडीट: लोकसत्ता टीम



नवीन नोकरीमध्ये सुरूवातीचे काही दिवस फारच छान जातात, पण जसजशी कामाची व्याप्ती व व्यग्रता वाढते, तसतसे कार्यालयीन वेळ संपून गेली तरी कामाचा विचार काही केल्या मनातून जात नाही. त्यामुळे आपण कसे झोकून देऊन काम करतो, कामावर आपली कशी निष्ठा आहे असे विचार मनात येऊन आत्मसंतुष्ट वाटते. मग हळूहळू या आत्मसंतुष्टतेची सवय लागते व त्याचे व्यसन कधी होते हे लक्षातच येत नाही.


खरं म्हणजे कामाचे व्यसन आपल्याला लागले आहे हे जवळजवळ आयुष्याच्या मध्यावर आल्यावरच लक्षात येते, ते सुद्धा दुस-यांनी सांगितल्यावर. पण कामाच्या व्यसनाची सुरुवात मात्र या पहिल्या काही दिवसातच होते. इंग्रजीमध्ये ज्याला वर्कोहोलिक म्हणतात ते हेच. मग हळूहळू आपल्या आयुष्याचा पूर्ण ताळमेळच बिघडून जातो. सध्याच्या स्पर्धात्मक व गतिमान जगात त्यामुळेच आपली व्यावसायिक कारकीर्द व आयुष्याचा समतोल  ठेवणे हे आपले शारीरिक-मानसिक-आर्थिक-सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी अत्यावश्यकच आहे.


आपली व्यावसायिक कारकीर्द व आयुष्याचा समतोल ढळतो आहे, बिघडतो आहे हे आत्मपरीक्षण केल्यास पुढे दिलेल्या लक्षणावरून तुम्हालाही कळेल.


 v सतत व खूप काम केल्याने शारीरिक व मानसिक थकवा येणे

  v शांत झोप न झाल्यामुळे एकाग्र चित्त न होणे

  v कामात लक्ष न लागल्याने कामे अपूर्ण राहणे

  v कामात लहान-मोठय़ा चुका होणे व त्याबद्दल दोषी वाटणे

  v सारखी चिंता भेडसावून त्याचे रूपांतर तणावात होणे

  v सहका-यांवर व कनिष्ठांवर अविश्वास दाखविणे

  v उत्पादकतेत घट होणे

  v आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होणे

  v कुटुंबाला वेळ देता न आल्यामुळे त्यांची व तुमची चिडचिड होणे

  v व्यसने करावीशी वाटणे

  v एकंदरीतच हताश वाटणे


दुर्दैवाने हा असमतोल वेळीच न कळल्यास, किंवा कळूनही त्यातून सावरू न शकल्यास अतिशय गंभीर परिणामांची उदाहरणे आपण ऐकतोच, जसे नोकरी जाणे, आर्थिक अडचणीत सापडणे, हृदयविकाराचा, अर्धागवायूचा झटका येणे, विकलांग होणे, आत्महत्येचे विचार मनात येणे आणि काही वेळेस मृत्यू येणे.


हे सर्व आपल्याला टाळायची सवय आतापासूनच करायची आहे. पुढे दिलेल्या समतोल चक्राच्या आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल की कार्यालयीन क्रिया हा आपल्या आयुष्याचा फक्त एकअष्टमांश भाग आहे. व्यावसायिक कारकीर्दीने इतर सात भागांवर आक्रमण केल्यास आयुष्य असमतोल होईल.


समतोल चक्र


व्यावसायिक कारकीर्द व आयुष्याचा समतोल कायमच राखण्यासाठी समतोल चक्रातील सर्व भागांचे समान महत्त्व आहे.

v आध्यात्मिक: लोकांना दिसणा-या तुमच्या  व्यक्तिमत्त्वाची      ओळख यातूनच निर्माण होते. त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व        उजळविण्यासाठी सजगपणे प्रयत्न करावयाला हवेत.

v आरोग्य: सर सलामत तो पगडी पचास!सातत्याने उत्तम      शारीरिक व मानसिक आरोग्य असेल तर आपण कुठलीही संधी  घेऊ  शकतो.

v कार्यालयीन: शिक्षणामुळे मिळालेल्या कौशल्याचा पूर्ण उपयोग करून जास्तीत जास्त उत्पादकता आपण देऊ शकलो पाहिजे.

v सामाजिक: नोकरीची, अर्थार्जनाची संधी केवळ समाजामुळे मिळाली आहे, याची जाणीव आपल्याला सतत असणे आवश्यक आहे.

v वैयक्तिक विकास: वाढत्या वयाबरोबर व्यक्तिमत्त्वाला पोषक अशा विविध पैलूंचा विकास होणे आवश्यक आहे, अन्यथा आयुष्य निष्क्रिय व गतिहीन होते.

v कौटुंबिक: नोकरीच्या आधी, नोकरी असताना, व नोकरी संपल्यानंतर सुखदु:खात आपल्या बरोबर असणार आहेत ते फक्त कुटुंबीय. आपला शारीरिक-मानसिक-आर्थिक-सामाजिक आधारवड म्हणजे आपलं कुटुंब.

       v नियोजन: असमतोल होण्याचे कदाचित मुख्य कारण म्हणजे        आयुष्यातील नियोजनाचा अभाव. आपल्याला वरीलपैकी            कुठल्याही बाबतीत अंमलबजावणी करावयाची असेल तर त्या        बाबीचे प्रथम नियोजन करायला हवे.


असो. नोकरीच्या पहिल्याच वर्षांत या गंभीर विषयाचा परिचय करून द्यायचे कारण एवढेच की तुम्ही आत्ताच सजग व्हावे. समतोल चक्राचा साकल्याने व सखोल विचार करून आपल्या आयुष्यातील सर्व धोरणे आखायला व त्यांच्या अंमलबजावणीला सुरुवात करावी आणि उत्तम कार्य-आयुष्याचा समतोल साधावा.

आपल्याला काही शंका विचारायच्या असतील किंवा प्रतिसाद द्यायचा असेल तर आपण jayantpanse.blog@gmail.com  ह्या माझ्या मेल आयडी वर कधीही पाठवू शकता. मी शक्यतो लवकरात लवकर आपल्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करेन.

© डॉ. जयंत पानसे  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पुढची पायरी - अनुक्रम

  पुढची पायरी ही लेखमाला  लिहिताना अमुक एक  असा आराखडा  काही मनात नव्हता.  उद्योग क्षेत्रात अगदी खालच्या स्तरापासून  ते उद्योग प्रमुख  म्हणज...